Indian Roller Bird (नीलकंठ) @ Nisargshala
वॉव तो बघ किंगफिशर असे जोरात ओरडुन ‘तो’ पक्षी इतरांना दाखवताना प्रत्येक सकाळी कुणीना कुणी हिवाळ्यात कॅम्पसाईट वर असतेच असते. तो दिसतानाच इतका सुंदर दिसतो की त्यावरुन नजर हटतच नाही आणि तिकडे बघत बघतच , पाहणारा इतरांना तो पक्षी दाखविण्याची लगबग करीत असतो. बर हा पक्षी देखील भलताच शांत व अजिबात घाई नसलेला असतोय. अगदी सर्वांना यथेच्छ दर्शन, फोटोग्राफी करे पर्यंत तो झाडाच्या सर्वात उंच फांदीवर उन्हं खात बसतो. अगदी दररोज सकाळी बसतो.इतक्यात माझ्या कानावर हे सर्व आले अथवा मला दिसले तर मी आवर्जुन तिकडे जाऊन पाहुण्यांना सांगतो की हा किंगफिशर नसुन नीलकंठ म्हणजे इंडियन रोलर बर्ड आहे (Indian Roller bird).
आपल्याकडे म्हणजे निसर्गशाळा येथे हिवाळ्यातील हक्काचा पाहुणा म्हणजे नीळकंठ/नीलकंठ/नीळपंख/चास अश्या विविध नावाने ओळखला जाणारा नितांत सुंदर पक्षी. आपल्या वेल्हा भागात यास खिळ-खिळ्या असे स्थानिक लोकं म्हणतात. याला खिळ-खिळ्या का म्हणतात हे मात्र मला समजु शकले नाही. कदाचित खुपच वयस्कर लोकांना विचारावे लागेल म्हणजे कदाचित समजेल असे नाव पडले ते.
असो. चला तर आपण या नीलवर्णी पक्ष्याची जमेल तेवढी माहिती घेऊयात. अनेकजण जे यास पहिल्यांदाच पाहतात त्यांना हा पक्षी किंगफिशर म्हणजे खंड्या आहे असेच वाटते. पुणे शहराच्या आसपासच्या परिसरात अगदी सर्वत्र हा पक्षी दिसतो. कावळे दिसतात इतके संख्येने खुप जास्त नसतात तरीही एखाद-दोन पक्षी दिसतात. विशेषतः विरळ झाडी-झुडपे , गवताळ मैदाने आहे अशा प्रदेशात हे पक्षी आढळतात. खरतर हे स्थानिक पक्षीच आहेत पण ते स्थानिक स्थलांतरं करीत असतात. ही स्थानिक स्थलांतरं थंडी, पाऊस, उन्हाचा तडाखा यापासुन स्वतःचे संरक्षण करण्यासाठी असतात. मुळचा भारतातीलच असलेला हा पक्षी इरान-इराक पर्यंत आढळल्याच्या नोंदी आहेत. तर इकडे ब्रह्मदेशापर्यंत देखील याचा आढळ आहे. म्हणजे दक्षिण आशिया किंवा भारतीय उपखंड हा याचा मुख्य अधिवास होय.
पावसाळ्यात मला वेल्ह्यात नीळकंठ कधीही दिसला नाही. अतिपावसामुळे कदाचित या काळात नीळकंठ कमी पावसाच्या भागात स्थलांतर करीत असावा.
मला जितक्यांदा नीलकंठ दिसला आहे तितक्यांदा त्यास मी एकटा असलेलाच पाहिला आहे. म्हणजे हा पक्षी एकटा राहणेच पसंत करतो.
एकदा कॅम्पसाईट परिसरात वणवा लागला आणि वाळलेल्या गवतातुन छोटे मोठे किटक इकडुन तिकडे उडु लागले. हे किटक म्हणजे पक्ष्यांसाठी मेजवानीच. किटकांवर ताव मारण्यासाठी सर्वात आधी पोहोचले ते म्हणजे कोतवाल तर पाठोपाठ आला तो नीलकंठ होय. नीलकंठ माणसांना खुप भीतो असे काही नाही. त्या वणव्यामध्ये जिथे जिथे आम्ही वणवा विझवायचो तिथे तिथे आमच्या अगदी जवळ येऊन महाशय किटकांना पकडायचे व ताड-ताड/काट-काट करीत चोचीने फस्त करायचे. याची चोच खुपच ताकदवान व धार असलेली असते. किटकांसोबत सरडे, पाली देखील सर्रास नीलकंठ खातात. त्याहीपेक्षा आश्चर्याचे म्हणजे दोन-तीन फुट लांबीपर्यंतचे साप देखील नीळकंठ पक्षी सहज खातो असे पाहण्यात आले आहे.
निसर्गशाळेची पहिली तीन वर्षे आपण वीजेशिवाय कारभार केला. त्याकाळात निसर्गशाळा ख-या अर्थाने अंधारी शाळा होती व निसर्गाचा अगदी फर्स्ट-हॅंड अनुभव आलेल्या पाहुण्यांना मिळायचा. आत्ताही मिळतोच म्हणा पण तो काळ काही औरच होता. तर तेव्हा नीळकंठ महाशय बाजुला असलेल्या पिपरीच्या झाडाच्या शेम्ड्यावर अथवा, रस्त्याच्या दिशेला असलेल्या अहिनाच्या झाडाच्या शेंड्यावर विराजमान असायचे. अहिनाच्या झाडावरुन एक उडाण घेऊन महाराज यायचे पिपरीवर. पिपरीच्या एखाद्या फांदीवर बसुन, शेजारील भाताची कापणी केलेल्या शेतावर नजर फिरवायचे. कुठे एखादा किटक दिसला की लगेच पुन्हा एक उडाण घेऊन त्या किटकाला चोचीत पकडुन झाडावर घेऊन यायचे व मिनिटांत मिचक्या मारीत फस्त करायचे. तर झाडाचा शेंडा ही टेहळणी करायची जागा आणि सोबतच उन्हं खायची देखील. अनेक वेळा मी नीळकंठास झाडावर अगदीच नुसते बिनकामाचे बसलेले पाहिले आहे. असे बिनकामाचे खरतर काहीही नसते निसर्गात. उन्हं खाताना पंखांतील परजीवी काढणे, पंख स्वच्छ करणे, नीटनेटके करणे हे काम ते करतातच. तरीही उन्हं खाणं हे नीळकंठाच्या दृष्टीने खुप महत्वाचे काम असावे असे एकंदरीत जाणवते.
याला नीळकंठ का म्हणतात या विषयी थोडं अनुमान आपण लावु शकतोच, की याचा कंठभाग थोडासा पुसटश्या निळ्या छ्टेचा आहे. पंख , पोट कंठापेक्षा खुपच जास्त निळे असतात, तरीही यास नीळपंख असे न म्हणता नीळकंठ म्हटले गेले कारण रामायणामध्ये याचा आलेला उल्लेख होय. रावण हत्या म्हणजे ब्राह्मणहत्या व ब्राह्मणहत्येच्या पातकापासुन मुक्ती मिळवण्यासाठी केलेल्या व्रताला स्वयं भोलेनाथ नीलकंठ पक्ष्याचे रुप घेऊन उपस्थित होते अशी आख्यायिका उत्तर भारत तसेच बंगाल मध्ये सर्वश्रुत आहे. भगवान शंकराशी असलेली हीच नाळ लक्षात घेऊन भारतभर या पक्ष्याला नीळकंठ याच नावाने ओळखले जाते.
याचे नितांत सुंदर रुप तुम्हाला जर पहायचे असेल तर तुमच्यामध्ये संयम असायला हवा. एखाद्या झाडाच्या फांदीवर बसलेला नीळकंठ तुम्हाला दिसला तर तुमचे भाग्य समजा आणि जर तो उड्डाण करताना दिसला तर ते तुमचे परमभाग्य समजा. कारण याचे अद्भुत दैवी सौंदर्य केवळ याचे उड्डाण सुरु असतानाच अनुभवण्यास येते. नीळ्या रंगांची सर्वात सुंदर, आकर्षक जी छ्टा असेल ना अगदी तीच छटा नीलकंठच्या पंखांना खालच्या बाजुने व वरच्या बाजुने अर्ध्यापासुन पुढे दिसते. ही रंगसंगती इतकी सुंदर असते की तुम्ही एकदा जार ते पाहिल तर ते दॄश्य पुनः पाहण्यासाठी तुम्ही आहात तसेच कितीही वेळ वाट पाहण्यासाठी तयार असता.
कर्नाटक, तेलंगणा, ओडीशा, आंध्रप्रदेश व बिहार अश्या भारतीय राज्यांच्या राज्य पक्ष्याचा दर्जा या स्वर्गीय पक्ष्यास मिळाला आहे. मुळातच धार्मिकतेशी जोडला गेला असल्याने याला संरक्षण प्राप्त झाले आहे, नाहीतर इतका सुंदर पक्षी नक्कीच खुप मोठ्या प्रमाणात शिकार केला गेला असता. तरीही युरोपियन लोकांच्या आगमनानंतरच्या काळात युरोपात टोप्यांना पंख लावण्याच्या फॅशन मुळे या पक्ष्याचे खुप मोठ्या प्रमाणात शिकार करुन पंखांची युरोपात तस्करी केली गेल्याच्या नोंदी आढळतात. बंगाल तसेच दक्षिणेकडील काही भागात दस-याच्या आसपास या पक्ष्यास पकडुन विक्रीसाठी ठेवण्यात यायचे. दस-याच्या दिवशी याचे दर्शन होणे म्हणजे साक्षात भोलेनाथाचा खुप मोठा आशीर्वादच होय अशी धारणा अद्यापही आहेच. तरीही जबरदस्तीने पक्षी पकडुन त्याची विक्री करण्यावर अनेक राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार हा पक्षी संरक्षित आहे.
दक्षिणेत याला पाला-पिट्टा म्हणतात. याचे पंख जर दुभत्या गाई म्हशीला खाऊ घातले तर तिचे दुध वाढते अशी देखील अंधश्रध्दा देशातील काही भागात या पक्ष्याला मारक ठरली आहे. तमिळ मध्ये पाला म्हणजे दुध व पिट्टा म्हणजे पक्षी. अर्थात ही अंधश्रध्दा आहे व यावर देखील बंदी घातली आहे व ह्ळुहळू का होइना पण जनजागृती होत आहे.
जसे मराठीमध्ये , भारतीय भाषेत नीलकंठ असे का म्हंटले जाते याचे तर्कसंगत उत्तर मिळते तसेच इंग्रजी मध्ये रोलर का म्हणत असावेत असाही प्रश्न मला पडलाच. रोल करणे , रोलिंग करणे हे एक प्रकारचे कौशल्य आहे. ते असे की वेगात असतानाच हवेतल्या हवेतच विविध कर्तबे करीत करीत मादी नीळकंठ पक्ष्याला आकर्षित करुन घेणे. अद्याप मला नीळकंठ पक्ष्याचे असे हवेतील बहादरी पहावयास मिळाली नाही. पण लक्ष ठेवुन आहे, लौकरच दिसेल.
साधारणपणे मार्च ते जुन असा यांचा विणीचा हंगाम असतो. याच काळात नर-मादी एकमेकांची निवड करतात. मग एखाद्या झाडाच्या खोबणीत, ढोलीत, अथवा मातीच्या ढिगा-यात घरटे करतात. मादी ३ ते पाच अंडी देते व वीसेक दिवसांत उबवते देखील. पिलांना खाऊ घालण्याचे काम नर-मादी दोघे मिळुन करतात. साधारण पिले एक महिन्याची झाली की घरटे सोडुन स्वतः विश्व पालथे घालण्यासाठी उड्डाण घेतात, व पालक देखील विभक्त होतात; असे काहीसे यांचे जीवनचक्र आहे. एक नीळकंठ पक्षी साधारणपणे १७ वर्षे जगतो.
तुम्हाला हा देवतुल्य पक्षी पहायचा असेल तर अवश्य निसर्गशाळेला भेट दिल्यावर आम्हाला आठवण करुन द्या म्हणजे विनासायास हा पक्षी तुम्हाला दाखवता येईल.
कशी वाटली नीळकंठ विषयी ही माहिती तुम्हाला? निसर्गशाळा फेसबुक पेज अवश्य लाईक करा, युट्युब चॅनेल ला सब्स्क्राईब करा. खालील निसर्गशाळा परिसरात टिपलेले नीळकंठ या पक्ष्याचे काही फोटो आहेत, अवश्य पहा.
भेटुयात लौकरच
धन्यवाद
हेमंत ववले – ९०४९००२०५३
निसर्गशाळा, पुणे
Our next Birding trip is on 28th Jan 2023, to Andhari Jungle near nisargshala. Click below to know more.
Indian Roller Bird.
Yet another beautiful bird, Indian roller bird (नीलकंठ) spotted at the campsite during last weekend’s Nisargshala camping trip.
The colorful wings of this bird attracts attention immediately. Very rare to spot, this bird has got status of sacred bird in Hinduism and is considered as Avatar of Lord Shiva, who keeps eye on the world while flying. Also it is considered as the representative to Lord Shreeram according to a folk poem of north India. Sighting Neelkanth on dussera is considered very sacred amongst Hindus.
[WRP
Plan you camping trip to view many such beautiful birds, with Nisargshala.
Yet again, these great photos captured by none other than Yashdeep Malwade
Comments
Beautiful simply beautiful is enough to express feelings.
Dr.Anant Sardeshmukh
January 22, 2022Beautiful simply beautiful is enough to express feelings.